महिला दिन विशेष अगं.. ये धृरपदे कव्हा असतो गं.. महिला दिन

Foto
भारत आणि इंडिया संकल्पना गडद करणारा ऑन दि स्पॉट रिपोर्ट

शहरापासून म्हटले तर फारसे दूर नाही, मात्र शहरीकरणापासून कोसो दूर असलेले गोलटगाव. अगदी टिपीकल. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यासारखे! 8 मार्च. जागतिक महिला दिन. हा महिला दिन नेहमीच्या ठोकळेबाज पद्धतीने साजरा करण्यापेक्षा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे  ‘सांजवार्ता’ ने ठरवले. जगभर... अगदी ‘इंडियात’ सुद्धा धुमधडाक्यात साजरा होणारा महिला दिन भारतातील गोलटगावात कमालीचा दीन वाटला. असा काही ’दिवस‘ असतो हे तेथील महिलांच्या गावीही नव्हते..! 

गणवाडी सेविकेचा कष्टमय प्रवास
शिक्षणाची आवड असूनही केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेता आल्याची खंत गोलटगावातील अंगणवाडी सेविका सुलभा अर्जुन यंडाईत यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली. शिक्षण पूर्ण झाले असते तर मी आज अंगणवाडीत चांगल्या पदापर्यंत पोहोचले असते. असेही त्या म्हणाल्या. शेती काम आणि अंगणवाडीत काम करुन त्यांनी मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले. त्यांना पाच मुली आहेत. एक मुलगी शिक्षिका असून अनेक मुलांना तिने घडविले असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तर दुसरी मुलगी परिचारिका म्हणून रुग्णसेवा करत आहेत. इतर तीन मुलींनाही शिक्षत केल्याचे त्यांनी सांगितले. महिला आज प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनीही चांगले शिक्षण घेतले पाहिजे. कुठलेही संकटे आली तरी मेहनत करायची तयारी ठेवावी असेही त्यांनी सांगितले.

यापुढे यशाकडे सदैव झेप घ्यायची
शहरात मुली कधीही, कुठेही जाऊ शकतात, फिरु शकतात हवे तसे कपडे घालण्याची त्यांना अनुमती असते. परंतु आजही ग्रामीण भागातील मुली त्यांचे अनेक स्वप्न बंद डब्ब्यात कैद करून ठेवतात. अशाच गावातल्या एका स्व्पनवेड्या तरुणीने भाग्यश्री साळुंखेने तिचे मत मांडले. गावातून शहरात शिक्षणासाठी अपडाऊन करतांना हवी तेवढी सुरक्षितता नसल्यामुळे गावातील मुलींना घरीच बसण्यासाठी सांगितले जाते, हि त्या ठिकाणची परिस्थिती आहे.भाग्यश्री म्हणाली, ’ आम्ही गावात राहत असलो म्हणून काय झाले, आमच्यात सुद्धा जिद्द आहे पण आई वडिलांचा तेवढा विश्वास नाही’. तिच्या मते शासनाकडून जेवढ्या काही योजना मुलींसाठी राबविण्यात येत आहे त्या त्यांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाही. खूप छोट्या गोष्टींमध्ये गावातल्या मुलांना आनंद लपलेला असतो, जसे गावात वाचनालय असावे हे तिचे वैयक्तिक मत. पुढे जाऊन भाग्यश्रीला आयपीएस व्हायचे आहे, सध्या ती सर्वोदय महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. आई - वडिल किराणा दुकान चालवून व दोन्ही मुलांना शिकवत आहे.  
आपल्या गावाला कसे पुढे नेता येईल , इथल्या मुलींसाठी काय करता येईल हेच भाग्यश्रीचे ध्येय आहे. ’ आमच्या गावातल्या मुलींचे सुद्धा शहरातल्या मुलांसारखे खूप स्व्पन आहेत, पण इथली परिस्थिती आम्हाला मागे ओढते, लोकं काय म्हणतील हाच आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. गावातल्या सगळ्या मुली सुशिक्षित व्हायला हव्या, असे तिला वाटते. आज इथल्या मुलींचे सर्वसाधारणपणे नववी दहावी पर्यंत शिक्षण होते, फार तर फार दहावी पर्यंत. बोटावर मोजण्या इतक्या मुली  पुढे शिकतात. कमी वयात झालेले लग्न, अपुरे शिक्षण यामुळे पुढे जाऊन यांच्या आयुष्य मातीमोल होते. आजही खेड्यातील स्त्रीयांचा पदर डोक्यावरुन खाली पडत नाही.पहाटे पासून ते रात्रीपर्यंत तिला विश्रांती नाही. घरातले आवरायचे , त्यात शेतातली कामे. या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने, हौस - मौज यांना स्थानच नाही. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे, यशस्वी होत आहे . परंतु असे असतांनाही आजही ग्रामीण भागांमध्ये ज्या रुढी - परंपरा आहेत त्या कितीही जाचक असल्या तरीही त्या नाकारु शकत नाही. रांधा, वाढा, उष्टी काढा एवढेच त्यांचे महत्त्व. या महिलांचा कोणता ’ महिला दिन ’ असावा? आजच्या दिवशी त्यांचा सन्मान होणे सुद्धा गरजेचे आहे.

छोटीशी आशा
गावातील महिलांना श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांचे प्रश्‍न सोडवणार्‍या विद्या वाघ यांना आम्ही भेटलो. विद्याताईंचे पती देविदास वाघ  डॉक्टर आहेत,पण स्वत: त्या मात्र फक्त 10 वी पर्यंत शिकु शकल्या. स्वत:ची शिक्षणाची , स्वत:ची आवड , पाहिलेले स्वप्न आज त्या मुलीमार्फत पूर्ण करत आहेत. त्यांची मुलगी हर्षदा 9 वीत आहे, पुढे जाऊन तिला आयपीएस अधिकारी बनायचे आहे. 10 वी नंतरचे तिचे शिक्षण गावात होणे शक्य नाही त्यामुळे विद्या ताई कुटुंबासमवेत शहरात स्थलांतरित होणार आहे. शेवटी त्यांनी महिला दिनासाठी एक संदेश आपल्या मैत्रीणींना दिला, ’ग्रामीण भागात  महिला एकत्रित येऊन काम करत नाही, संसारात सतत त्या गुंतलेल्या असतात, त्यासाठी एकत्र येऊन बदल घडवायला हवा ’. 

महिला दिन म्हणजे काय?
एकीकडे आज आपण महिला दिन साजरा करत आहोत. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना महिला दिन साजरा करणे तर दूर हा दिवस कधी असतो हेही माहीत नाही. या महिला सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करतात. शेतात राबतात त्यांचा कसला आला महिला दिन? असे चित्र ग्रामीण भागात दिसून आले.शेतात जाणार्‍या सिंधुबाई ढगे यांची भेट झाली त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या महिला दिन म्हणजे काय हे सांगा मॅडम ? आणि तो कव्हा असतो ? असा प्रश्न सिंधुबाई यांनी उपस्थित केला. 

उतारवयातही आज ती एकटीच
जर्द पिवळी नऊवारी नेसलेल्या, कपाळावर रुपयाएवढे कुंकू ठासून लावलेले चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. त्या सुरकुत्यांच्या घड्यांमध्ये दुख खूप सारे अनुभव लपलेले पाहायला मिळाले.सखुबाई जगताप म्हणाल्या ’ पोरगा शहरात राहतो,अन पोरीचबी लगीन झालय,मी गावामंदी एकलीच राहते, आमच्या कारभारीसंग’ हे सांगतांना त्यांच्या चेहर्‍यावरचे दुख लपत नव्हते. मुलीचे शिक्षण न केल्याची खंत त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. ते महिला दिन अन पोरींच शिक्षण - बिक्षण, काय कळत नाय म्हणत आजीबाई रस्त्यावरुन तरातरा निघूनही गेल्या. 

प्रगतशील शेतकरी महिला द्रौपदाबाईंची यशोगाथा
प्रगतशील शेती केली तर शेतीसारखा चांगला दुसरा कुठला व्यवसाय नाही ,हे गोलटगाव रोडवरील एका शेतकरी महिलेच्या यशोगाथेतुन स्पष्ट झाले आहे. पाणी नाही म्हणून रडून कसे चालेल. शेतात घाम घळण्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल हे शेतकरी महिला द्रौपदाबाई बाबासाहेब गाढेकर यांनी त्यांच्या शेतीकामातून दाखवून दिले आहे. त्या ऋतूनुसार पीकांची लागवड करतात. कमी पाण्यावरील पीक त्या घेतात. पूर्वी बांध बांधून पिकांना पाणी द्यावे लागायचे. त्यात पाणी खूप लागायचे.  द्रौपदाबाईंनी त्यांच्या शेतात ठिबक सिंचनाचा वापर  केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते. कापसाबरोबरच , ज्वारी, हरबरा, सह आदी पिकांची लागवड यंदा त्यांनी केली आहे. त्या स्वतः शेतात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम करतात. खुरपणी , नांगरणी,फवारणी हि पुरुषी कामे त्या उत्साहाने करतात.आज भारतात शेतकरी महिलांचे प्रमाण 14 % एवढे आहे. महिलांनी कुठल्याही क्षेत्रात आज स्वावलंबी होणे गरजेचे आहे हेच द्रौपदीबाईंच्या जीवनातून समजते.

आता रडायंच नाही लढायचं
एक वाडा दिसला, त्यात वेगवेगळे कुटुंब राहत होते. त्याच वाड्यातल्या एका छोट्याशा खोलीबाहेर एक आजी पायरीवर बसलेल्या. काय आजी काय म्हणता, कशा आहात म्हणत आजींसोबत गप्पा सुरू झाल्या. आजी म्हणाल्या काय सांगू बाई, आमच्या बहिणाबाई म्हणतात ना तस, 

माझं दुख, माझं दुख
तयघरात कोंडलं
माझ सुख, माझ सुख
हांड्याझुंबरं टांगलं 

काय म्हणता लेकीबाळी? हा प्रश्न विचारताच आजींच्या संयमाचा बांध फुटला. बोलण्यातून आजींच्या आयुष्याची वेदनादायी कथा समजली. जुनी जख्म उकरल्यावर भळाभळा रक्त वाहू लागते तसे आजींच्या बाबतीत झाले. धक्कादायक सत्य म्हणजे ग्रामीण भागात आजही 10 मागे 8 मुलींचे 15 - 16 व्या वर्षी लग्न होते.यांच्या मुलीचे देखील वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न लावून दिले गेले. तिला दोन मुले झाली. लग्नानंतर तिचा फार छळ झाला,असे आजींनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी तिच्या स्वत:च्या सासर्‍याने तिला घरगुती वादातून फाशी दिली. तिची दोन्ही लेकरे आज बिनाआईचे जगत आहेत. परंतु ज्यांनी त्यांच्या आईचा जीव घेतला आजही ते पुराव्यांअभावी बाहेर आहेत ,असे निर्मला लाळेंनी सांगितले. आजींचे पती वारलेले , घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत लहाण्या मुलाचे शिक्षण सुरु अशा परिस्थितीत आजी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी काहीच करू शकल्या नाही. रडत रडत आजींनी मुलीची आठवण काढली. हे सर्व सांगतांना त्यांच्याही नकळत डोळ्यातून अश्रू घळाघळा बाहेर पडले.दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरी करुन, शाळेत काम करुन आजी आज दिवस काढत आहेत. संपूर्ण आयुष्य गरिबीत गेले, गावाबाहेर कधी त्या पडल्याच नाहीत म्हणून स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय असते? महिला दिन म्हणजे नेमके काय? हे आजींना माहीत नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker